गडमुडशिंगी परिसरात एकच जल्लोष रस्ते झाले गुलालमय : आनंदोत्सव
गडमुडशिंगी : महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत केलेला जल्लोष.
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे आमदार अमल महाडिक विजयी झाल्याबद्दल आणि राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याबद्दल गडमुडशिंगी आणि पंचक्रोशीत एकच जल्लोष करण्यात आला. साखर पेढे वाटत फटाके फोडण्यात आले.
गांधीनगर मध्ये भाजप करवीर दक्षिण मंडलचे अध्यक्ष विशाल पिंजानी, माजी सरपंच पुनम परमानंदानी, रितू लालवानी, अमित बटेजा, माजी पंचायत समिती सदस्य सरिता कटेजा व त्यांच्या सहकार्यानी चौका चौकात आमदार अमल महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांना साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
गडमुडशिंगीमध्ये आनंदोत्सव
महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्या विजयश्रीबद्दल गुलालाची उधळण करत गडमुडशिंगीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व उपसरपंच तानाजी पाटील व कार्यकर्त्यांनी चौका चौकात जाऊन गुलालाची उधळण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विजयाबद्दल तानाजी पाटील म्हणाले की लाडकी बहीण, शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले निर्णय आणि अमल महाडिक यांनी विकासातून जनतेला दिलेला विश्वास विजयास कारणीभूत ठरला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून आमदार अमल महाडिक यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद नक्कीच मिळेल.
वळीवडे झाले गुलालमय
वळीवडे : आमदार अमल महाडिक विजयी झाल्याचे वृत्त समजताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटत गुलालाची मुक्त उधळण केली. जय बजरंग तालमीपासून सर्व रस्ते गुलालमय झाले. चौकाचौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. माजी सरपंच अनिल पंढरे व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना आलिंगन देत आनंद उत्सव साजरा केला. माजी सरपंच अनिल पंढरे म्हणाले की महायुती शासनाच्या विकासात्मक धोरणांचा व अंमलबजावणीचा महाविजय आहे.#
दरम्यान, चिंचवाड येथेही भाजप सह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत चौका चौकात आनंद उत्सव साजरा केला. आमदार अमल महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
विकास आणि जनतेचा विजय : तानाजी पाटील
आमदार अमल महाडिक यांच्या विजयाबद्दल श्री.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले की हा तर विकास आणि जनतेचा विजय आहे. महायुती सरकारने केलेली विकासकामे हेच या विजयाचे गमक आहे.