कळंत्रेवाडीत ट्रॅक्टरच्या धडकेत महावितरणच्या पोलचे नुकसान
कळंत्रेवाडीत बत्ती गुल
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबाला ट्रॅक्टरची धडक लागल्याने खांबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण गावातील बत्ती गुल झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणावरून ट्रॅक्टर चालला होता. समोरून काही वाहने आली म्हणून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पाठीमागे घेण्याच्या नादात रस्ता अरुंद असल्याकारणाने ट्रॅक्टर विद्युत पोलला धडकल्याने पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन धोकादायक स्थितीत गेला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महावितरणने गावचा विद्युत पुरवठा बंद केला असून कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सदर विद्युत पोल बदलणे गरजेचे आहे. त्यानंतरच विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. सुदैवाने सदर घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.