जिल्हाधिकारी अमोल येडगे येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन
स्वीप अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकासह केएमटी बसस्थानकावर मतदार जनजागृती
प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, प्रवासी मतदारांनो तुम्ही आवश्यक कामासाठी परगावी जात आहात, पण 20 नोव्हेंबरला आपल्या मतदान असलेल्या गावी पोहचून मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक व शाहू मैदान येथील केएमटी स्थानकावर निवडणूक स्वीप टीमच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रत्येक एसटी तसेच केएमटी बसवर लावण्यात येणाऱ्या मतदान दिनांक व मतदान करा याबाबतचे स्टिकर प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते एसटी बसवर लावण्यात आले. एसटीने प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांना गुलाब पुष्प देवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन, यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी के.मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहायक स्वीप नोडल अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले. स्वीप टीम अंतर्गत जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूरचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, वर्षा परिट उपस्थित होते.
मध्यवर्ती बसस्थानकावरुन मदत कक्षातील सार्वजनिक उद्घोषणा ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी केले. ते म्हणाले, बहुतांश प्रवाशांच्या विश्वासाची असणाऱ्या एस.टी. मधून प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 20 तारखेला आपल्या गावी जावून मतदान करावे, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या गावात उपस्थित राहून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांनी केएमटीच्या बसेस मध्ये जावून प्रवाशांना मतदानादिवशी मतदान करण्याची विनंती केली. प्रत्येक वेळी कोल्हापूर जिल्हा मतदार टक्केवारीत अग्रेसर असून याही वेळी मतदान करुन आपला जिल्हा एकुण टक्केवारीत अग्रेसर राहील याची खात्री आपण देवूया, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी एस.टी मधील प्रवाशांसी सवांद साधून गाव कोणते, कधी परत येणार ? 20 तारखेला विसरु नका, मतदान आहे. परगावाहून नक्की परत येवून आपला मतदानाचा हक्क बजावा, असा संवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा’ या आशयाचे स्टीकर प्रातिनिधीक स्वरूपात बसमध्ये चिकटवले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगार मिळून 500 एस.टी. व 70 केएमटी बसेस आहेत. त्यासर्व बसेस मध्ये हे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग
प्रत्येक एसटीमध्ये बसस्थानकावरील कर्मचारी, चालक तसेच वाहक यापैकी ज्यांना जमेल ते प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. जिल्ह्याची मतदान टक्केवारी यावेळी 80 टक्के पार करीत एक नवा इतिहास रचूया असेही ते सांगताना दिसत आहेत. एसटी महामंडाळाने सुरू केलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांनी केले.