मोदींनी 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला जेलमध्ये टाकू म्हंटल्यावर दहा दिवसात अजित पवार उपमुख्यमंत्री : राज ठाकरे
70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आम्ही जेलमध्ये टाकू, असे पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर दहा दिवसांनतर अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, असे म्हणत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते पुण्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
पुण्यात सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी पक्षाचे चाळीस आमदार निघून जातात आणि पक्षाला पत्ताच नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर अजित पवारांसोबत आपले पटत नाही, म्हणून एकनाथ शिंदे बाहेर पडले. आणि नंतर तेच अजित पवारांसोबत जाऊन बसले, असे म्हणत हा सगळा सावळा गोंधळ होतो. त्यांचा तुम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एका पक्षाला बांधील असतो आणि आम्ही जाऊन त्या पक्षाला मतदान देतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
माझ्यासाठी कसब्याचे खूप महत्त्व आहे. ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यानंतर मी माझा पहिला महाराष्ट दौरा सुरू केला. त्यानंतर पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना करण्याआधी कसब्याच्या गणपतीची पूजा करून मी पक्षाची स्थापना केली असल्याचे सांगत कसबा आणि कोथरुडच्या जागा माझ्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.