क्राईम
Kalyan Crime: कल्याणमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण
खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गाव हद्दीत बुधवारी रात्री एक अल्पवयीन विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांना दोन जणांनी बेदम मारहाण केली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगम लोखंडे (३७), निरंजन संगम लोखंडे (१९) अशी आरोपींची नावे आहेत. ते पिता-पुत्र आहेत.
अल्पवयीन विद्यार्थी उंबर्डे गावातील नेटकरी चौक भागात राहतो. खडकपाडा पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अल्पवयीन विद्यार्थी आणि आरोपी संगम आणि निरंजन लोखंडे हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात यापूर्वी जमिनीच्या विषयावरून वाद झाला होता. या वादामधून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. बुधवारी रात्री साडे आठ वाजता अल्पवयीन विद्यार्थी उंबर्डे येथील नेटकरी चौक येथून चालला होता. त्यावेळी आरोपी संगम, निरंजन लोखंडे यांनी संगनमत करून तक्रारदाराला पकडून त्याला लाकडी दांडक्याने, हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. हेतुपुरस्सर दुखापत केल्याने तक्रारदार अल्पवयीन विद्यार्थ्याने याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.