शरद पवार गट घेणार ‘हे’ चिन्ह ? पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार
मुंबई : सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा त्यांनी बहूमान मिळवला. तारुण्यातच त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली. मुंबईतील दंगल थोपवली, मुख्यमंत्री असताना किल्लारीच्या भूकंपानंतर तिथल्या जनतेचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले. नंतर त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून पक्ष सोडला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. वय वाढत गेलं, पण त्यांचा संघर्ष तसाच कायम राहिला. ऐंशी वर्ष गाठल्यानंतरही त्यांनी साताऱ्यात भरपावसात सभा केली. आता निवडणूक आयोगाने त्यांचा पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला. तरीही ते डगमगले नाही. आता नवं नाव आणि नवं चिन्ह घेऊन हा ८३ वर्षाचा तरुण पुन्हा भिडणार आहे. पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. हा संघर्षशील तरुण दुसरे तिसरे कोणी नसून शरद पवार आहेत.
शरद पवार यांच्या हातून निवडणूक आयोगाने पक्ष काढून घेतला आहे. चिन्हही काढून घेतले आहे. ज्याने पक्षाला जन्म दिला, पक्ष वाढवला, त्यांच्या हातूनच त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी हे खलबतं सुरू आहेत. कोर्टात काय मुद्दे मांडायचे, पुरावे काय द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय म्हटलंय यावर दिल्लीत खल सुरू आहे.
▪️उगवता सूर्य घेणार
दरम्यान, निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे सूचवण्यास सांगितले आहे. तसेच तीन नवी चिन्हही द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे पवार गटाकडून आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सूचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गट पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://parnerdarshan./358/embed/#?secret=Vls0rGuaBw#?secret=l3ZTs2R0Dl
▪️जल्लोष… जल्लोष
दरम्यान, पक्षाचं नाव आणि चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्यानंतर धुळ्यात अजितदादा गटाकडून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हा जल्लोष केला आहे. तसेच एकमेकांना पेढे भरवतही आनंद व्यक्त केला आहे. शहरातील झाशी राणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी एकच वादा अजितदादाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजित पवार, अजित पवार आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
▪️सत्याचा विजय झाला
निवडणूक आयोगाचा निकाल येताच ठाण्यातही जोरदार जल्लोष करण्यात आला. ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. यावेळी एकमेकांना पेढे भरवण्यात आले.