मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार मुसंडी मारली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते.या निवडणुकीत युवासेना आणि भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. या सिनेट निवडणुकीवरून चांगलंच राजकारणही तापलं होतं.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचा १० पैकी १० जांगावर विजय झाला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीतही युवासेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीतही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, युवासेनेने सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच ‘इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो’, असा सूचक इशारा आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?
‘१० पैकी १० पुन्हा एकदा! ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्या सर्वांचे आणि शिवसेना (ठाकरे गट) युवासेना सहकाऱ्यांचे, तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरी केवळ पुनरावृत्ती केली नाही तर सुधारली आहे. १०० टक्के स्ट्राइक रेट. इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो’, असं आदित्य ठाकरेंनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला. यानंतर आता विजयी उमेदवार आज (२८ सप्टेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच सिनेट निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना भवन परिसरात जल्लोष करण्यात आला आहे.
मतमोजणीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बोगस पोलिंग एजंट बसवल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात सिनेट निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली होती.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला.