शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केल स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली : राजन तेली
भाजपात दाखल झालेल्या नारायण राणे कुटुंबीयांकडून सतत त्रास : राजन तेली
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे कोकणात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. राजीनामामध्ये त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच पक्ष सोडण्यामागची कारणंही सांगितली आहेत . यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, आता दोन दिवसात राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाला दिलेले राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात त्यांनी राणे कुटुंबीयांवर आरोप केले आहेत.
या पत्रात राजन तेली यांनी म्हटले आहे की, एकाच कुटुंबाला एक लोकसभा दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणे कुटुंबीयांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत असल्याचा दावा तेली यांनी पत्रातून केला आहे. माजी आमदार राजन तेली ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच येणारी विधानसभा निवडणूक ते लढणार असल्याचे बोलले जात आहे. आज शुक्रवारी १८ ऑक्टोंबर रोजी ते पक्षात प्रवेश करणार असून तत्पूर्वी त्यांनी भाजप सदस्यत्वाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठांकडे दिला आहे.
पत्रात नेमकं काय?
‘आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राणे कुटुंबियांकडून तसेच पक्षांतर विरोधकांकडून आपल्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे, बांदा शहरापुरती मर्यादीत असलेली भाजप संघटना आपण वाढवली जिल्हाभरात ताकद निर्माण केली.शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. परंतु आयत्यावेळी मात्र त्या ठिकाणी माझे खच्चीकरण करण्यात आले. मागच्या वेळी संधी असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मी भरू शकलो नाही केवळ पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यामुळे हातात एबी फॉर्म असताना सुद्धा आपण अपक्ष उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
‘२०१९ मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करणे असा प्रकार घडला. पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले, परंतु भाजपात दाखल झालेल्या नारायण राणे कुटुंबीयांकडून पुन्हा माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मी कुडाळ तालुक्यातील घोडगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो आहे. कष्ट करून माझी राजकीय कारकीर्द निर्माण केली आहे. ज्या पक्षात गेलो त्या ठिकाणी शंभर टक्के प्रामाणिक काम केले आहे. स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली आहे.
दरम्यानच्या काळात झालेले खच्चीकरण लक्षात घेता झालेल्या सर्व प्रकार व घटना सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र त्यावर कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे वरिष्ठांचा नाईलाज असू शकतो हे मी समजू शकतो, असंही माजी आमदार राजन तेली यांनी म्हटले आहे.