श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
मिरज:- संजय पवार
हरिपूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ विचारवंत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. डी.बी. पवार यांचे शुभहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
‘वाचन प्रेरणा दिन’ व ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विठ्ठल मोहिते म्हणाले की, वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात. माणूस ज्ञानवंत होतो. बुद्धिमान होतो. विचारी बनतो. भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. वाचनाने आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते. जीवनात यशस्वी बनण्याचा राजमार्ग वाचनातूनच मिळतो. जगाच्या पाठीवर यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या यशाचं रहस्य चौफेर वाचन हेच आहे. डॉ.कलामांचे वाचन,व्यासंग, चिंतन, मनन,संशोधन यामुळेच ते ‘आदर्श विद्यार्थी’ ते ‘भारताचे राष्ट्रपती’ आणि ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाचे मानकरी ठरले. शालेय विद्यार्थ्यांनी वाचनवेड जपावं आणि आपलं जीवनही समृद्ध करावं. याप्रसंगी संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरघर संविधान अभियानाबद्दल श्री. अजितकुमार कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. मुख्याध्यापक डी.बी. पवार यांनी ‘वाचन प्रेरणा दिन’, व ‘हर घर संविधान’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आभार श्री. बबन शिंदे यांनी मांनले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक संध्या गोंधळेकर, पूजा पाटील, मनीषा वड्डदेसाई, हर्षदा काटकर तसेच सेवक-विद्यार्थी उपस्थित होते.