ग्रामीण चूल संस्कृतीला अखेरची घरघर
घरातील चूल हद्दपार अनं चुलीवरील जेवणासाठी धाब्यावर
रघुनाथ थोरात
चूल म्हटलं की आपल्याला आठवते अन्नपुर्णा देवता.प्राचीन काळापासून मानवी जीवनात या चुलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.परंतु, सध्याच्या या विज्ञान युगात स्वयंपाक घरातील या चुलीची जागा सिलेंडर गॅसने घेतल्यामुळे ग्रामीण भागातील या चूल संस्कृतीला अखेरची घरघर लागली आहे.धगधगत्या चुलीपुढे बसून एक भाकरी तव्यावर,दुसरी भाकरी चुलीच्या आरावर तर तिसरी भाकरी लाकडी काटवटीत थापत थापत लेकरा बाळांना कुरकुरीत पापुडा सुटलेली गरमागरम चुलीवरील स्वादिष्ट भाकरी खाऊ घालणारी आमची आजी मला आजही आठवते. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये भल्या सकाळी तसेच रात्रीच्या वेळी शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी चुली भोवती अख्ख कुटुंब बसत असे. घरातील आजारी अबाल वृद्धांना थंडीपासून संरक्षण करण्याचे काम चूल करीत असे. पूर्वीची माणसं चुलीतील राखुंडीचा उपयोग दात घासण्यासाठी एक नैसर्गिक दंतमंजन म्हणून करीत असत.पूर्वी कुंभार वर्ग चुली बनवण्याचे काम करीत होता. त्याचा मोबदला त्यांना धान्य स्वरूपात वर्षातून एकदा मिळत असे.परंतु, काळाच्या ओघात चूल ही गेली आणि पर्यायाने कुंभार वर्ग अडचणीत आला. त्याकाळी सर्वांकडेच काडेपेटी उपलब्ध होतीच असे नव्हते. मग पर्याय म्हणून स्वयंपाक झाल्यावर तोच विस्तव चुलीमध्ये राखेत दाबून ठेवला जात असे आणि गरजेनुसार अग्नी पेटवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे.शासनाने अत्यल्प दरात गॅस सिलेंडर उपलब्ध केल्यामुळे अगदी डोंगर कपारीतील छोट्या-मोठ्या वाड्या वस्त्यांवरील घरामध्ये या चुलीची जागा गॅस सिलेंडरने घेतली आहे. जशी जशी जीवनशैली बदलत गेली तशा तशा वापरातील वस्तूही हायटेक होत गेल्या. गेल्या पाच दहा वर्षात तर शहरातील जीवनशैली ग्रामीण भागात रुजू झाली. स्वयंपाक घरातील जुन्या काळातील चुलीनेही हायटेक रूप धारण केले. त्यामुळे ग्रामीण चूल संस्कृतीला अखेरची घरघर लागून काळाच्या ओघात लोप पावलेली चूल आता शोधायची कुठे? हा मुख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
घरातील चुल हद्दपार करून चुलीवरचे जेवण असे फलक लावलेल्या धाब्यांवरती जाऊन खिसे खाली करणारा वर्ग दिसून येतो..!