कळंत्रेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी
वनविभागाची घटनास्थळी भेट
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथे पहाटेच्या सुमारास उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.परंतु,बिबट्याच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केल्यामुळे सुदैवाने कुत्रा बचावला. यामुळे नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,येथील रहिवासी बळीराम यादव यांच्या पाळीव कुत्र्यावर शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घरापाठीमागील असलेल्या उसाच्या शेतातून अचानकपणे आलेल्या बिबट्याने घरासमोरील पाळीव कुत्र्यावर जोरदार हल्ला चढवत त्याला उसाच्या शेतात अक्षरशः फरफटत नेले.सदर कुत्र्याने बिबट्याला जोरदार प्रतिकार केल्यामुळे कुत्रा सुदैवाने बचावला आहे. परंतु,जवळपास दहा ते बारा ठिकाणी बिबट्याचे दात कुत्र्याच्या शरीरात घुसल्याचे आढळले असून कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्याच्या गळ्याभोवती तसेच शरीरावर खोलवर जखमा झालेल्या आहेत. जखमी कुत्र्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार सुरू असून कुत्र्याच्या शरीरावर दहा ते बारा टाके पडले आहेत. दरम्यान,याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे सचिन खंडागळे तसेच शंभूराजे माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या सदरच्या हल्ल्यामुळे कळंत्रेवाडी परिसरात त्याचे वास्तव्य कायम असून इथले भय संपत नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
इथले भय संपत नाही
बिबट्याच्या कुत्र्यावरील हल्ल्यामुळे या परिसरातील त्याचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून इथले भय संपत नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.