अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा थरार समोर, कथित हल्लेखोराने स्वतःच्याच फेसबुकवरून केलं होतं लाईव्ह
ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दहिसर येथील त्यांच्या कार्यालयात मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याचं माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सांगितलं. या गोळीबारात अभिषेक यांच्यावर दोन-तीन गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या हत्येचा थरार फेसबूकवरून लाईव्ह करण्यात आला आहे. मॉरिसभाई यांनीच त्यांच्या फेसबुकवरून हे लाईव्ह केलं होतं.
व्हीडिओत काय दिसतंय?
अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाईव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हीडिओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होतं.