ठाकरे गटाला पुन्हा धक्का? संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, “येत्या दोन ते तीन दिवसांत…”
माजी मुख्यमंत्री आणि कित्येक दशकं काँग्रेसमध्ये काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांना भाजपाने आता राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या पक्षबदलाच्या निर्णानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्यामागे काँग्रेसचे अनेक नेते भाजपात जाण्यासाठी तयार आहेत, असा दावा सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाकडून केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीदेखील मोठा दावा केला आहे. ते ‘टी व्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात”
ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सूक आहेत, असा दावा शिरसाट यांनी केलाय. “अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे काही नेते आणि आमदार आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत. ते आमच्या संपर्कातही आहेत. हे नेते कोण आहेत, ते आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र यामध्ये काही नेते आणि आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचा खुलासा अवघ्या दोन तीन दिवसांत कोल्हापूरच्या अधिवेशनात होईल,” असे संजय शिरसाट म्हणाले.