पोलिसांची ॲक्शन अन् ‘कहानी खत्म’
गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारांना उंब्रज पोलिसांचा हिसका
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा फोटो झळकावत रॅली काढून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना उंब्रज पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. रॅली काढून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठजणांवर कारवाई केली. त्यांच्याकडील बुलेट, युनिकॉर्नसह तीन गाड्या हस्तगत केल्या.यापुढे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला.अजय प्रकाश चव्हाण (वय २१), विनायक प्रविण निकम (वय २०), प्रणव काशिनाथ चव्हाण, तेजस राजेंद्र सुतार (वय २१), शुभम संभाजी कदम (वय २०), योगेश पांडुरंग थोरात (वय २०), अक्षय प्रकाश चव्हाण, विजय पोपट निकम (वय २८ सर्व रा. इंदोली ता. कराड) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांचा अहवाल तयार करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व परिसरात गस्त घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार इंदोली येथे संशयित युवकांचा जमावर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे फोटो, बॅनर हातात घेऊन रॅली काढली होती. इंदोली येथील हुतात्मा स्मारक ते ग्रामपंचायत अशी शेतकरी गणेश मंडळाने रॅली काढली होती. या रॅलीत दुचाकी वाहनांचा वापर करण्यात आला. शिवाय क्या करता बॉस… आनाही पडा… पब्लिक की डिमांड थी… अॅक्शन सुरू नही हुआँ… अशा आशयाचे गाणे लावून सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल केली. पोलिसांच्या हे निदर्शनास आले. यानंतर याप्रकरणी निलेश अशोक पवार (वय ३२) या पोलीस कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढणारांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादीत म्हटले आहे की, रॅली काढणारांनी गुन्हेगाराचे उदात्तीकरण करत समाजात दंगा होईल असे कृत्य केले आहे. शिवाय जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी कारवाईचे कौतूक केले. तसेच यापुढे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सोडायचे नाही असा इशारा देत उंब्रज पोलिसांचे मनोबल उंचावले.