जिल्हा परिषदेच्या कायाकल्प स्पर्धेत चरेगावचे उपकेंद्र जिल्ह्यात प्रथम
चरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
रघुनाथ थोरात
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने कायाकल्प २०२३ या जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रे या दोन गटांमध्ये ठेवलेल्या स्पर्धेमध्ये चरेगाव येथील आरोग्य उपकेंद्राचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याची माहिती चरेगावचे सरपंच देवदत्त पतंगराव माने यांनी दिली. रोख एक लाख रुपये तसेच प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कायाकल्प या नावाने स्पर्धा घेतो. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र असे दोन गट केले जातात. त्यामध्ये आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांमध्ये असलेली स्वच्छता, मिळणारी सेवा,रेकॉर्ड,असणाऱ्या सोयी सुविधा, राबवत असलेल्या सरकारी योजना आदी गोष्टी तपासल्या जातात. त्यामध्ये विविध आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रे भाग घेतात. जिल्हा परिषदेच्या कमिटीकडून वरील बाबींची तपासणी झाल्यानंतर त्यातून नंबर काढले जातात. त्यानुसार चरेगाव उपकेंद्रात असलेली स्वच्छता,राबवत असलेल्या विविध योजना,आयुष बागेमध्ये लावलेल्या विविध औषधी वनस्पती, रेन हार्वेस्टिंग सिस्टीम,आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी तसेच ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी यांचे सांघिक काम या सर्व गोष्टी तपासून या पुरस्कारासाठी चरेगाव उपकेंद्राची निवड करण्यात आली. सदर चरेगाव उपकेंद्रांतर्गत खालकरवाडी, शितळवाडी,भवानवाडी या गावांचा समावेश होतो. दरम्यान,आरोग्य उपकेंद्राच्या या यशापाठीमागे आरोग्य समुदाय अधिकारी अश्विनी शेवाळे मॅडम, सिस्टर देशमाने मॅडम,गावातील सर्व आशा सेविका,सरपंच देवदत्त माने, भवानवाडीचे सरपंच प्रवीण यादव, खालकरवाडीचे सरपंच अंकुश खालकर,शितळवाडीचे सरपंच प्रशांत बर्गे,उपसरपंच सारिका डुबल, ग्रामसेवक आतार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले. त्या पार्श्वभूमीवर चरेगावच्या उपकेंद्रात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ शुभम जाधव, आरोग्य अधिकारी गरुड रावसाहेब, सर्व कर्मचारी वृंद,चरेगाव,भवानवाडी, शितळवाडी,खालकरवाडी येथील सर्व सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.