भले तरी देऊ कासेची लंगोटी.. नाठाळांच्या माथी हाणू काठी
रघुनाथ थोरात
संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय या आपल्या ओवीतून नाठाळ अपप्रवृत्तींवर वज्र प्रहार करत निर्भयपणे लिहितात. त्यांची विचारसरणी अत्यंत सरळ व ठाम होती. या ओवीतील तुकोबांची भाषा अत्यंत स्पष्ट अनुभवजन्य व वास्तव दर्शवणारी आहे. संसारी वाटेने जात असताना “सुख राईएवढे दुःख पर्वता एवढे” अशी परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली. त्यांचे जीवन वेड्यावाकड्या वळणांनी,उग्र-दाहक अनुभवांनी भरलेले होते. तुकारामांच्या गाथेने मराठी समाजाला सांस्कृतिक आचरणाचा,जीवनाचा आदर्श दाखवून दिला. समाजातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी कडाडून हल्ला केला. तुकारामांची अभंगवाणी ही अज्ञानाला ज्ञानी,अडाण्याला शहाणे करण्यासाठी अवतरली.तुकोबांच्या या ओवीतून वेळ पडली तर आम्ही स्वतःची लंगोटीही देऊ इतके आम्ही उदारमतवादी आहोत.परंतु,कोणी आम्हाला कमजोर समजून आमच्या लंगोटीलाच हात घालत असेल तर, आम्ही अशा नाठाळांचे टाळके सडकायलाही कमी करणार नाही..हा भावार्थ स्पष्ट होतो.. अतिशय मृदू स्वभावाच्या तुकोबांचा हा अभंग म्हणजे आजकाल समाजात सर्वत्र फोफावलेल्या नाठाळ अपप्रवृत्तींना मोठी चपराक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उपजतच मेणाहून मऊ असलेला व्यक्ती प्रसंगी वज्रालाही भेदू शकणारे काठिण्य अंगी बाळगू शकतो हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. तुकोबांनी वर्ण व्यवस्थेच्या, जातीभेदाच्या भिंती ओलांडून आदर्श समाज निर्मितीसाठी अवघी हयात खर्ची घातली. समाजातील नाठाळ अपप्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी स्वभावातील मृदूपणा बाजूला सारून एखाद्या कसलेल्या योद्धाप्रमाणे रणभूमीवर खंबीरपणे आपले पाय घट्ट करीत रणशिंग फुंकणे हेच योद्धयाचे लक्षण आहे. तसेच युद्ध हेच एका वीराचे प्रमाण आहे. त्यामुळे आजकालच्या या युगात फोफावलेल्या नाठाळ अपप्रवृत्तींना ताळ्यावर आणण्यासाठी तुकोबांच्या या ओवीला अनुसरून आचरण करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर या अपप्रवृत्ती तुमचे जगणे मुश्किल करतील यात तीळ मात्र शंका नाही…!
समाजात फोफावलेली नाठाळ अपप्रवृत्ती
संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबांच्या या ओवीला अनुसरून आचरण केले तर समाजात फोफावलेल्या नाठाळ अपप्रवृत्तीचे समूळ उच्चाटन होईल. ..!