उंब्रजच्या कॉलेजकुमारांवर पोलिसांची कारवाई
१६ दुचाकींवर केसेस दाखल;१०५०० रुपयांचा दंड वसूल
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता.कराड येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या सोळा दुचाकीस्वार कॉलेजकुमारांवर केसेस दाखल करून जवळपास १०५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सकाळी ११ च्या सुमारास कॉलेज सुटण्याच्यावेळी काही रोड रोमिओ कॉलेजकुमार कॉलेजच्या नावाखाली परिसरात घुटमळत असल्याची माहिती उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे यांना मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर कॉलेज कुमारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यामधील अनेक मुले ही अल्पवयीन असल्यामुळे मुलांच्या पालकांना शाळेत बोलवून चांगलीच समज देण्यात आली. सदर कारवाईमध्ये पीएसआय रमेश ठाणेकर,कोमल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात,हेमंत पाटील,श्रीधर माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जाधव यांनी सहभाग घेतला होता.