शत्रुला बळ देणारी फंदफितुरी :रक्तातील नात्यांची रुंदावती दरी
रघुनाथ थोरात
प्रतिस्पर्धी,शत्रूला सामील झालेल्या अपप्रवृत्तीला फितुर म्हणतात.फितुरी विश्वासघातकी असण्याबरोबरच शत्रूला बळ देणारी ठरते. त्यास फंदफितुरी असेही संबोधतात.या ठिकाणी फंद हा शब्द गळ्याभोवती आवळलेला फास या अर्थी वापरण्यात आला आहे. या दगाबाज फितुरांमुळे प्रसंगी दारूण पराभवाचा देखील सामना करावा लागतो.विशेष करून हे फितुर जर स्वकीय असतील तर मात्र परिस्थितीची दाहकता भयावह अशीच असते.आपल्याच रक्तातील असणाऱ्या परंतु,शत्रूला जाऊन मिळालेल्यांना रक्तातील परके फंदफितुर म्हटले तर वावगे ठरणार नाही. थोड्याशा अंतर्गत मतभेदांमुळे नाराज होऊन प्रतिस्पर्ध्यांशी हात मिळवणी करीत त्यांच्या गोटात सामील होऊन स्वकीयांचे,रक्तातील नात्याचे मानसिक खच्चीकरण,अध:पतन करण्याचे काम हे घरभेदी अविरतपणे करीत असतात.परंतु,हे सर्व करत असताना नैतिकता,मानवी मूल्ये,नीतिमूल्ये सर्व काही आपण पायदळी तुडवीत आहोत याचा पूर्णपणे विसर पडल्याने रक्ताच्या नात्यांमधील दरी अधिकच रूंदावत जाते. जेव्हा बहिणीवर एखादे संकट येते तेव्हा काही कारणांमुळे आपल्याशी अबोला धरलेला आपल्या रक्ताचा सख्खा भाऊच आपल्या मदतीला धावून येतो तर जोडलेला भाऊ कुठल्या कुठे गायब होतो हे वास्तव आहे.आजच्या घडीला ज्याच्याकडे जिव्हाळा,प्रेम,आत्मीयता जपणाऱ्या समृद्ध नात्यांचे भांडार आहे तोच अधिक श्रीमंत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.परंतु, फक्त काही अंतर्गत मतभेदांचा राग डोक्यात ठेवून आपल्याच रक्तातील व्यक्तीची काहीही करून जिरवायचीच ह्या सुडबुद्धीने पेटून उठलेल्या घरभेद्याला सत्य-असत्य,न्याय-अन्याय,नैतिक- अनैतिक यातील फरक कोण समजावून सांगणार?आपले आजी-आजोबा,आई-वडील,भाऊ पर्यायाने संपूर्ण कुटुंबावर अन्याय केलेल्या अपप्रवृत्तीला,शत्रूला सामील होऊन संपूर्ण कुळाचे केलेले अध:पतन कधीही भरून न येण्याजोगे असून पूर्वजांच्या आत्म्यास परमोच्च वेदनादायी आहे असेच म्हणावे लागेल..!
रक्ताचे भरीव तर जोडलेले तकलादुच
रक्ताचे नाते हे अखंड भरीव असते. तर जोडलेले हे दिलेल्या जोडामुळे कमजोर,तकलादुच राहते हे संकटसमयी कळते.कारण जेव्हा संकट येते ना..तेव्हा रक्ताचीच नाती धावून येतात हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. ..!