सातारा जिल्हा

दूध एक पूर्णान्न…बनले आर्थिक निकड

 

रघुनाथ थोरात

 

पूर्वी आहारातील मुख्य घटक म्हणून दुधाकडे पाहिले जात असे. त्यामुळे घराघरात दुधाचे अक्षरश: पाट वाहत असत. प्रत्येक घरात जणू काही कृष्णाचे गोकुळ अवतरल्याचा भास होत असे. घरातील लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आहारात मुख्य घटक म्हणून दुधाचा अगदी मनसोक्त आस्वाद घेत असत. त्यामुळे त्याकाळी शारीरिक आरोग्य उत्तम प्रकारे राहत असे. दूध तसेच त्यापासून बनवलेले

दही,ताक,लोणी,तूप, दूध आटवून तयार केलेला खवा यांसारखे उपपदार्थ अगदी सहजरित्या घराघरात उपलब्ध होत असत. कारण त्याकाळी लोकांचा दुधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त पूर्णान्न आणि पौष्टिक आहार यापुरताच मर्यादित होता. परंतु, सध्याच्या युगात हेच दूध कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकणारी आजची आर्थिक निकड बनले आहे.हे वास्तव नाकारता येत नाही.पूर्वी प्रत्येक कुटुंबाकडे गाई- म्हैशी यांसारखी जनावरे असायची. कुटुंबाची दूध-दुभत्याची गरज भागवणे एवढाच मर्यादित उद्देश असायचा. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आहारात मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध होत असे. म्हणूनच त्याकाळी लोक शंभर शंभर वर्ष जगत असत. दुधाचे दही लावण्यापासून ते तूप निघेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया नैसर्गिकरित्या घरामध्येच केल्या जात असत. दुधाचे दही बनवल्यानंतर त्यातून लोणी काढण्यासाठी घुसळावे लागते. त्यासाठी घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी घुसळखांबा असायचा. त्याला मोठी लाकडी रवी दोरीच्या सहाय्याने बांधलेली असे. घरातील स्त्रिया हे घुसळण्याचे काम करीत असत. घुसळून तयार झालेल्या लोण्याला कडवून बनवलेल्या तुपाच्या भरणीतील तुपाचा वास सदाकाळ घरात दरवळत असे.दूध तसेच दही साठवून ठेवायची पद्धतही निराळी होती. काथ्यापासून बनवलेले शिंकाळे स्वयंपाक घरातल्या तुळवीला टांगलेले असायचे. त्यामध्ये दूध,दही ठेवले जात असे. परंतु, काळानुरूप सर्वकाही बदलले. आधुनिक युगात माणसाच्या गरजाही वाढल्या पर्यायाने पूर्णान्न असलेल्या ह्या दुधामध्ये व्यवसायिकता कधी आली हेच समजले नाही. दुधाची विक्री करून कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यास हरकत नाही. कारण कुटुंब चालवण्यासाठी पैसा हा हवाच. परंतु,घरातील आबालवृद्धांना खाऊपिऊ घालून शिल्लक राहिलेल्या दुधाची विक्री करून आर्थिक गरज भागवली तर ते आपल्या कुटुंबाच्या बौद्धिक तसेच शारीरिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.नाहीतर येणाऱ्या पिढीमध्ये शारीरिक दुर्बलता वाढीस लागून कुटुंबावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

घराचे गोकुळ झाले इतिहास जमा

 

गुरे दावनीला..दूध डेअरीला आणि घरात मात्र शिल्लक घोटभर ते फक्त चहाला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button