उंब्रज येथील युवकांचा प्रामाणिकपणा
सापडलेला महागडा मोबाईल केला परत
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता.कराड येथील दोन मुलांनी बाजारपेठेत सापडलेला मोबाईल परत करत प्रामाणिकपणा दाखवला. त्याबद्दल त्या मुलांचे ठिकठिकाणी कौतुक होत आहे. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उंब्रज येथील दोन युवक आदित्य सचिन घोलप व स्वरुप शरद साळुंखे हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपला बाजार येथे फिरत फिरत गप्पा मारत पोहोचले असता या मुलांना रेडमी १२ या कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी हा मोबाईल कोणाचा आहे याची आसपास चौकशी करता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी उंब्रज पोलीस स्टेशन गाठले व तेथील पोलीस अधिकारी यांच्याकडे तो प्रामाणिकपणे सुपूर्द केला. तात्काळ उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय धुमाळ व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी मोबाईल वरुन सदर व्यक्तीला फोन केला व त्यांस विचारपूस करून खात्री पटल्यानंतर मोबाईल मालक समरजीत सुरेश जाधव रा.पाटिल रोड उंब्रज यांच्या ताब्यात दिला.दरम्यान,
उंब्रज पोलीस स्टेशनचे API रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील यांनी अदित्य व स्वरुप यांचे त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल अभिनंदन केले.युवकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल समाजात एक चांगला संदेश जाऊन इतरांनाही त्याची प्रेरणा मिळेल असे उदगार याप्रसंगी सपोनि रविंद्र भोरे काढले.