कार्यक्रम गावाचा अनं रूबाब रावाचा
व्यक्तीकेंद्रित मनमानीला उधान
उत्तरमांडच्या काठावरून-भाग दोन
रघुनाथ थोरात
एखादा सार्वजनिक कार्यक्रम जेव्हा व्यक्तीकेंद्रित होतो तेव्हा तो समाजाच्या टीकेचे लक्ष ठरतो.कारण सार्वजनिक कार्य हे सार्वजनिक स्वरूपातच संपन्न व्हावे हे इष्ट असते.त्याला जर वैयक्तिक स्वरूप आले तर मात्र,चौफेर टिकेच्या भडीमारात सर्वकाही मातीमोल होते. कोणत्याही सार्वजनिक कार्याची पूर्वतयारी ही सार्वजनिक ठिकाणीच झाली पाहिजे.नाहीतर “कार्य देवालयी अनं पूर्वतयारी हिमालयी” अशा भिन्न टोकाच्या चित्रामुळे दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा होणे स्वाभाविक आहे.लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे आपण मात्र कोरड्या पाषाणासारखे वागायचे ही दुटप्पी भूमिका समर्थनीय नाही. नुसता देव देव करून देव भेटत नसतो तर त्याला आपले आचरण सुद्धा तेवढेच निर्झर झऱ्याप्रमाणे असावे लागते.त्यामुळे कोणाची तरी जिरवण्यासाठी,त्यांना ह्या सर्व प्रक्रियेतून जाणीवपूर्वक डावलण्यासाठी जणू काही संपूर्ण समाज तुमच्या विरोधात उभा ठाकलायं, समाजानं तुम्हाला बहिष्कृत केलयं हे आभासी चित्र निर्माण करून संपूर्ण कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, त्यांना यातनामय आयुष्य वाट्याला आणण्यासाठी हे सर्व आपल्या मर्जीनुसार मनमानी करीत ओढून ताणून जमवून आणण्याचा घाट घालण्यासाठीचाच हा सर्व खटाटोप करणाऱ्या प्रवृत्तीची वैचारिक पातळी किती हीन,खालच्या दर्जाची असू शकते?याचा विचार न केलेलाच बरा..!
ओठात रामकृष्ण हरी अनं आतून कुरघोड्या भारी…!
समाजामध्ये वावरताना अशा अपप्रवृत्ती पावलोपावली आढळतात. “सौ चुहे खाके बिल्ली हजको चली” हे त्यांचे खरे रूप असल्यामुळे देव त्यांना चार हात लांब ठेवणेच पसंत करेल यात तिळमात्र शंका नाही…!