गडमुडशिंगी प्राथमिक शाळा एक आदर्श शाळा : खा.धनंजय महाडिक
गडमुडशिंगी येथे नवीन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन करताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक सोबत राजाराम कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक, प्रभारी सरपंच तानाजी पाटील आणि इतर मान्यवर. (छायाचित्र: दीपक गुरव)
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गडमुडशिंगी (ता.करवीर ) येथे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्राथमिक शाळेच्या भव्य इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना महाडिक म्हणाले आपल्या शाळेची एक सर्व सुविधा पूर्ण एक सुसज्ज इमारत निर्माण होवून एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येईल. तसेच महाडिक यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत सर्वसामान्यांच्या जीवनात झालेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी मोदी सरकारच्या मोफत धान्य योजना, पाच लाखांच्या आरोग्य विमा, कोरोना लसीकरण, शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना आदींचे यशस्वी परिणाम सांगत विरोधकांवर टीका केली. काँग्रेसने फक्त खोटी आश्वासने दिली, परंतु त्यांची पूर्तता केली नाही, असे ते म्हणाले.
महाडिक यांनी अमल महाडिक यांचे कौतुक केले. त्यांनी आमदार नसतानाही कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी मराठी शाळेसाठी ६ कोटी ८५ लाख ८२ हजार रुपयांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
राजाराम कारखान्याचे संचालक आणि प्रभारी सरपंच तानाजी पाटील यांनी शाळेच्या इमारतीसाठी निधी आणताना आलेल्या अडचणींवर प्रकाश टाकला. गट शिक्षण अधिकारी इंद्रजीत पाटील यांनी या इमारतीला मिळालेल्या निधीचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, मुंबईनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निधीतून साकारली जाणारी ही शाळा होईल.
या शाळेची पटसंख्या तब्बल १२०० असून, शाळेची इमारत दोन विभागांमध्ये साकारली जाणार आहे. यात केंद्रीय प्राथमिक शाळा आणि कन्या विद्या मंदिर यांचा समावेश आहे. नव्या इमारतीत स्टाफ रूम, चेंजिंग रूम, किचन रूम, आणि सभागृह अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका कोळेकर यांनी केले, तर स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सुर्वे यांनी केले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, ग्रामपंचायत सदस्य अमित माळी, अशोक दांगट, जितेंद्र यशवंत, कृष्णात रेवडे,चंद्रकांत नेर्ले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही शाळा जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा ठरणार असून, ती महाराष्ट्रातील आदर्श शिक्षण संस्थांपैकी एक बनेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
तब्बल १२०० पटसंख्या असणारी जिल्हा परिषदेची शाळा जवळपास सात कोटी रुपयांच्या निधीतून उभी राहणार आहे. मुंबईनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निधीतून साकारली जाणारी ही शाळा असून, तिच्या इमारतीत केंद्रीय प्राथमिक शाळा आणि कन्या विद्या मंदिर अशा दोन विभागांचा समावेश आहे. या शाळेत स्टाफ रूम, चेंजिंग रूम, किचन रूम, आणि सभागृह अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.