रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर गणपती मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत.दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार दिवसांपूर्वी खड्ड्यांनी भरलेल्या या टप्प्यात मशीनद्वारे डांबरीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.परंतु,फक्त एकाच दिवसापुरते ग्रामपंचायत कार्यालय ते गणपती मंदिरपर्यंतच चरेगावकडून उंब्रजकडे जाणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करून अजूनही या टप्प्यात अर्धे काम बाकी असताना जवळपास चार ते पाच दिवसांपासून काम बंद आहे. दरम्यान, या टापूत प्रवास करणारे प्रवासी बऱ्याच कालावधीपासून या महाकाय खड्ड्यांमधून मोठ्या कसरतीचा सामना करीत प्रवास करीत आहेत.मध्यंतरी तर याच ठिकाणी दोन चार चाकींचा भीषण अपघात झाला होता.अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये पडून गंभीर जखमी झाले होते.अशी एकंदरीत परिस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने चारच दिवसांपूर्वी डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु,एकच दिवस काम करून गत तीन दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे वाहनधारक नाराजी व्यक्त करीत असून “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं” अशा प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करीत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर काम सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.