इंदोली हद्दीतील अवैध दारू विक्रीवर उंब्रज पोलिसांचा छापा
इंदोली हद्दीतील अवैध दारू विक्रीवर उंब्रज पोलिसांचा छापा
देशी विदेशी दारूचा १२३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदोली,ता.कराड गावच्या हद्दीत उंब्रज पोलिसांनी हॉटेल शिवार गार्डनवर छापा टाकून देशी विदेशी दारूचा १२३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान,बुधवार दिनांक २२मे रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे सपोनि रविंद्र भोरे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहितीनुसार,उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उंब्रज पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवार दिनांक २२ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, हवालदार संजय धुमाळ,कॉन्स्टेबल निलेश पवार, सागर साळे हे सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की,संशयित अमितकुमार रामचंद्र निकम हा इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत हॉटेल शिवार गार्डन चोरे रोड येथे आडोशाला बसून अवैधरित्या देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करीत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित अमितकुमार रामचंद्र निकम रा.इंदोली याच्या कब्जात बियर, मॅकडॉल,रॉयल स्टॅग,व्हिस्की,देशी दारू चा एकूण १२३००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर उंब्रज पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिली.