कोल्हापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, करवीर चे आमदार पी.एन.पाटील यांचे निधन
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, करवीर चे आमदार पांडुरंग उर्फ पी.एन.पाटील (वय 71 रा. मुळ गांव सडोली खालसा, ता. करवीर, सध्या रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांचं आज सकाळी निधन झालं. याबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली. आमदार पी. एन .पाटील हे रविवारी त्यांच्या राहत्या घरी पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यानं त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर आधुनिक जीव रक्षक यंत्रणा आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास उपकरणांच्या मदतीनं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.पण त्यांच्या प्रकृतीनं साथ दिली नाही. उपचारादरम्यान आज पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे.
दरम्यान, आज सकाळी 10 वा. त्यांचा मृतदेह काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता सडोली खालसा या त्यांच्या मुळगावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 1 वाजता तिथं अंत्यविधी करण्यात येणार आहे.