हरे माधव परमार्थ सत्संग समितीची गांधीनगरमध्ये जनजागृती रॅली
गांधीनगर येथे हरे माधव परमार्थ सत्संग समिती माधवनगर-कटनी (मध्य प्रदेश) च्या गांधीनगर शाखेच्या वतीने विश्व पर्यावरण दिनानिमित्त काढलेली जनजागृती रॅली.
घरोघरी दिला पर्यावरणाचा संदेश
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
निसर्गाला जपा… तो आपली जपणूक करेल, झाडे लावा-झाडे जगवा, असा संदेश देत विश्व पर्यावरण दिनानिमित्त विद्यमान सद्गुरु बाबा ईश्वरशाह साहिबजींच्या आशीर्वाद व प्रेरणेने हरे माधव परमार्थ सत्संग समिती, माधवनगर-कटनी (मध्य प्रदेश) च्या गांधीनगर शाखेच्या वतीने येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी यावेळी सत्संग समितीच्या वतीने रोपे वितरित करण्यात आली.
हरे माधव प्रवेशद्वारापासून (गेट) जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला. प्रमुख रस्त्यांवरून रॅली जात असताना सत्संग समितीचे काही सेवाधारी घरोघरी जाऊन वाढत्या पृथ्वीच्या तापमानाचा धोका टाळण्यासाठी मानवाने काय केले पाहिजे, याची माहिती देत होते. वृक्षसंपदा वाढविल्याशिवाय आपल्यापुढे आता पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सत्संग समितीचे सेवाधारी नागरिकांना समजावून सांगत होते.
गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे व माजी सरपंच श्रीमती पूनम परमानंदानी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. साऱ्या गांधीनगरवासीयांनी जनजागृती रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा रॅली हरे माधव प्रवेशद्वाराजवळ आली आणि तिथेच तिची सांगता झाली.