बैठकीत तोडले अकलेचे तारे अनं अंधारात चोरले पाण्याचे दारे
बैठकीत तोडले अकलेचे तारे अनं अंधारात चोरले पाण्याचे दारे
रघुनाथ थोरात
कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात असलेल्या एका आटपाट नगरात ‘न बोलून शहाणा’ या प्रवृत्तीचा महाभाग राहतो. दुसऱ्याच्या बुद्धीने चालण्याच्या सवयीमुळे नेहमीच कोण ना कोण तरी याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवीत असते तर हा महाभाग मात्र विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे नेहमीच तोंडावरती पडत असतो. प्रसंगावधान राखून कोणत्या प्रसंगी काय बोलावे? हा सदसद विवेक नसल्यामुळे याचा कैकदा कपाळमोक्ष झाला आहे. या अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याची सवय असलेल्या या महाभागाने एका वेगळ्या कारणासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतील चर्चा भलतिकडेच नेऊन कुणाच्यातरी सांगण्याने माझ्यावरती अचानकपणे वैयक्तिक आरोप सत्र सुरू केले. या महाभागाच्या अशा अचानक पवित्र्यामुळे मी क्षणभर गोंधळून गेलो. त्या बैठकीतील तो प्रसंग माझ्यासाठी खूपच धक्कादायक होता. त्या बैठकीत नसता विषय काढण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, फक्त आणि फक्त माझे मानसिक खच्चीकरण,अपमान करण्यासाठी जाणून-बुजून मला त्या महाभागाने टार्गेट केले.शेवटी मी त्या बैठकीतून बाहेर पडलो. अपमान तर झाला होता. मनात वेदनाही होत्या. मनातील वेदना तशाच दाबून तो प्रसंग मी पचवला. झाले गेले पाठीवर टाकून दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झालो. दरम्यान, मंगळवार दिनांक ४ जून रोजी रात्री ठीक १२ वाजण्याच्या सुमारास मळ्यात शेताला पाणी पाजताना त्या महाभागाने केलेल्या खोडसाळपणामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला पण रात्रभर जागरणाबरोबरच नसता मनस्ताप देऊन गेला. वार मंगळवार..रात्रीचे ठीक बारा वाजण्याची वेळ. . साडेदहा वाजता लाईट आल्यामुळे शेताला पाणी लावलं होतं. ते पाहण्यासाठी बारा वाजता गेलो असता “वासरात लंगडी गाय शहाणी” या म्हणीला शोभणारे वर्तन करणारा महाभाग माझ्या शेतातील चालू दारे बंद करून स्वतःच्या शेतात लावण्याची भामटेगिरी करून काहीच झाले नाही या आविर्भावात देवाच्या दारात आडवा झाला होता. माझ्या गाडीची चाहूल लागताच “अरे तू लावलं होतंस वय पाणी, मला माहीतच नाही..आत्ताच दारं केलं आहे माझ्या रानात.. घे तुझं तुला दारं” असे गोडबोल्या स्वरात सारवण करीत आपल्या कृत्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्यास म्हणालो, “कुणाच्या शेतात पाणी चालू आहे हे बघून फोन करून विचारायचं होतं. थेट दार कसं काय केलं?” त्यावर तो निरूत्तर झाला. अशा महाभागांचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे दात वेगळेच असतात. बैठकीत माझ्यावर तोंडसुख घेणारा महाभाग आज माझ्यासमोर खजील अवस्थेत निरूत्तर झाला होता. “भगवान के घर देर है..लेकिन अंधेर नही” याचा प्रत्यय या प्रसंगामुळे आला. महाभागाच्या या भामटेगिरीमुळे मला संपूर्ण रात्र उरलेल्या शेताला पाणी देत जागून काढावी लागली. परंतु,एका गोष्टीमुळे खरोखरच मन सुखावले की,तुम्ही कसेही वागा नियती आपले काम योग्य वेळी चोख बजावते.कारण मला बैठकीत उघडा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या, वैयक्तिक चारित्रहनन करणाऱ्या महाभागाला त्याच्या भामटेगिरीमुळे नियतीने उघडे पाडले होते हे मात्र नक्की…!