कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणूक राजेश क्षीरसागर यांच्यासाठी अटीतटीची तर सतेज पाटील यांच्यासाठी उत्तर ची लढाई प्रतिष्ठेचा प्रश्न बनली
राजेश क्षीरसागर व सतेज पाटील यांच्यात अटीतटी लढाई
प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसचे स्थिती मजबूत आहे. विधान परिषदेचे दोन आणि विधानसभेचे तीन असे पाच आमदार काँग्रेसचे आहेत. आणि काँग्रेसला चांगले दिवस आणण्यात सतेज पाटील यांचे परिश्रम कारणभूत ठरले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षात महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांची वाटचाल आता राज्यस्तरीय नेतृत्वाकडे सुरू आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सह महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतानाच कोल्हापूरच्या राजघराण्याने निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सतेज पाटील यांचे अवसान गळाले होते. कारण राजा घराण्याकडून त्यांचा अवसान घात करण्यात आला होता. कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून आपण कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असे राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी “नॉट रिचेबल”होऊन स्पष्ट केले होते. आता याच राजेश लाटकर यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीने पुरस्कृत केले आहे. तसे करण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.
काँग्रेस व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर विरुद्ध महायुतीचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. अगदी सुरुवातीला काँग्रेसने लाटकर यांनाच उमेदवारी दिली होती. नंतर ती मागे घेतली होती आणि आता त्यांनाच पुरस्कृत केले गेले आहे. अगदी सुरुवातीला राजेश लाटकर हे राजेश क्षीरसागर यांच्या तुलनेत फार ताकदीचे प्रतिस्पर्धी असल्याचे मानले जात नव्हते. आता बदललेल्या राजकारणात याच लाटकर यांनी चुरस वाढवली आहे.
राजेश लाटकर हे सतेज पाटील यांच्या प्रथम पसंतीचे उमेदवार होते आणि आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे चिन्ह गायब झाल्यानंतर सतेज पाटील यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आपण स्वतःच कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहोत असे समजून सतेज पाटील यांना लाटकर यांच्या विजयासाठी पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि नेतृत्वगुणांचा कस या मतदारसंघात लागणार आहे.
महायुतीचे राजेश क्षीरसागर यांना अगदी सुरुवातीला ही निवडणूक सहज आणि सोपी होती. विजयाचा गुलाल पुडीत बांधूनच ते वावरत होते. आत्ताही त्यात फारसा फरक पडलेला नाही. आपल्यासाठी निवडणूक रिंगणात नजीकचा प्रतिस्पर्धीच नाही अशा मानसिकतेत ते आहेत.
मधुरीमाराजे यांनी अचानक माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांच्या विषयी सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. ही सहानुभूती राजेश लाटकर यांच्यासाठी मतदान यंत्रापर्यंत नेण्याची मोठी जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर आली आहे. त्यांनी कोल्हापूर उत्तर साठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. आणि म्हणूनच या मतदारसंघातील निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही.
मधुरिमा राजे छत्रपती यांना निवडणुकीतून माघार घेण्याची इच्छा नव्हती. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी त्यांचा निर्णय मधुरिमा राजे यांच्यावर लादला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी एकाच घरात दोन पदे नकोत, राजेश लाटकर या कार्यकर्त्याचा त्यासाठी बळी जाता कामा नये, मी एक खासदार आहे आणि निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार मलाही आहेत असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की, त्यांनी आपला निर्णय लादलेला आहे. अर्ज माघारीचा निर्णय मधुरिमा राजे यांचा नव्हता असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. शेवटी “राजाज्ञा” महत्त्वाची ठरली असे म्हणावे लागेल.