जन्मदात्यांचे आई-वडील होता आले पाहिजे
म्हातारपणं..दुसरं बालपणं-भाग एक
रघुनाथ थोरात
ज्या जन्मदात्यांनी अनेक टके-टोमके खाऊन,संकटे झेलून आपणास जगण्या योग्य सक्षम केलं. त्या जन्मदात्यांच्या उतरत्या काळात आपणास त्यांचे आई-वडील होता आलं पाहिजे. कारण म्हातारपणं हे माणसाच्या आयुष्यातील दुसरे बालपणं असतं.
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आपल्यासाठी देह झिजवून सोसलेल्या यातनांची,उपसलेल्या कष्टाची,केलेल्या त्यागाची परतफेड या जन्मी नव्हे तर पुढील दहा जन्मात सुद्धा करता येणे शक्य नाही. आपल्या आईने नऊ महिने नऊ दिवस तिच्या गर्भामध्ये आपल्याला वाढवलं. अक्षरशः तिच्या रक्तावरती आपले पोषण झाले.आपल्या देहाचा सर्वांगीण विकास,योग्य ते गर्भसंस्कार झाल्यानंतर परमेश्वराने आपल्याला सृष्टीमध्ये,या अनोळखी जगामध्ये आणले. तेव्हा आपण या स्वार्थ, अहंकार,लोभ,हेवा,मत्सर,द्वेष या षडरिपूंनी व्यापलेल्या मतलबी दुनियेसाठी मातीचाच गोळा होतो. या गोळ्याला आकार देण्याचं काम आपल्या जन्मदात्यांनी केलं.बोटाला धरून चालायला शिकवलं,बोलायला शिकवलं. चालता चालता ठेच लागून कधी पडलोच तर धैर्याने उठायचं कसं?हे शिकवलं.आपल्या आजारपणात डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून अनेक रात्री जागून काढल्या.काहीबाही खाऊन प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्याला सोन्याचे घास भरवले. खिशाला न परवडणाऱ्या हौशी वस्तू तसेच उच्च प्रतीच्या कपड्यांबरोबरच नाना तऱ्हेचे हट्ट,लाड पुरवले. बालपण सरले, शालेय शिक्षणाबरोबरच आई-वडिलांनी दिलेली दैनंदिन आयुष्यातील संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवल्यानंतर ओठावरती बारीक लवेची मिसरूड केव्हाच फुटली होती. स्वतःमध्ये झालेल्या शारीरिक तसेच भावनिक बदलांना जाणून घेण्याचा तो स्फोटक काळ.आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हटले तर चालेल…!
क्रमशः
ओसंडून वाहणारे वृद्धाश्रम
आजकाल ओसंडून वाहणारे वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे करणाऱ्या जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून भौतिक सुखाच्या पाठीमागे धावणाऱ्या हायटेक पिढीची कीव करावीशी वाटते..