क्रीडा

किशनच्या वर्तणुकीमुळे ‘बीसीसीआय’ला जाग! ‘आयपीएल’ सहभागासाठी रणजी खेळणे अनिवार्य करण्याची शक्यता

मुंबई : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. मात्र, याचा त्याच्यासह सर्व खेळाडूंवर परिणाम होणार आहे. सध्याच्या ट्वेन्टी-२०च्या जमान्यात भारताच्या बहुतांश खेळाडूंकडून इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) प्राधान्य दिले जाते. परंतु ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवयाचा असल्यास आधी खेळाडूंना किमान तीन-चार रणजी सामने खेळणे अनिवार्य करण्याचा ‘बीसीसीआय’ विचार करत आहे.

किशन गेल्या काही काळापासून भारतीय संघापासून दूर आहे. तसेच रणजी करंडकात झारखंडचे प्रतिनिधित्व करणेही त्याने टाळले आहे. त्याच्या अनुपस्थितीत झारखंडचा संघ अ-गटात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यापेक्षा आपला ‘आयपीएल’ संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासह बडोदा येथे सराव करणे पसंत केले आहे. मात्र, ही बाब ‘बीसीसीआय’ला फारशी आवडलेली नाही. ‘बीसीसीआय’ने किशनला रणजी करंडकातील अखेरचा साखळी सामना खेळण्याची सूचना केली आहे. झारखंडचा अखेरचा सामना १६ फेब्रुवारीपासून राजस्थानविरुद्ध रंगणार आहे.

युवा खेळाडूंनी केवळ ‘आयपीएल’चा विचार करू नये यासाठी आता कठोर नियम करणे गरजेचे झाले आहे, असा ‘बीसीसीआय’मध्ये मतप्रवाह आहे. ‘‘काही खेळाडू प्रथमश्रेणी क्रिकेटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात हे ‘बीसीसीआय’मधील निर्णयकर्त्यांना ठाउक आहे. हे खेळाडू भारतीय संघातून बाहेर असल्यास मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेचे काही सामने खेळतात. मात्र, आपल्या राज्याच्या संघांसाठी लाल चेंडूंचे सामने खेळण्याची त्यांची तयारी नसते. अशा खेळाडूंवर वचक ठेवण्यासाठी आता ‘बीसीसीआय’कडून कठोर पावले उचलण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास खेळाडूंना किमान तीन-चार रणजी सामने खेळणे बंधनकारक केले जाऊ शकेल. तसेच ‘आयपीएल’ फ्रेंचायझींनी ज्या खेळाडूंना करारमुक्त केले आहे, त्यांना लिलावासाठी नाव नोंदवण्यासाठीही या नियमाची पूर्तता करावी लागू शकेल,’’ असे ‘बीसीसीआय’मधील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

काही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असूनही रणजी करंडकात खेळण्यास टाळाटाळ करत असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन नाराज असल्याची माहिती मिळत आहे. ‘बीसीसीआय’ने पुढाकार घेत काही नियम न बनवल्यास, हे खेळाडू प्रथमश्रेणी क्रिकेटकडे पाठ फिरवतील अशी राज्य क्रिकेट संघटनांची धारणा आहे.

फ्रेंचायझींना सूचना नाही

यंदा ‘आयपीएल’ २२ मार्च ते २६ मे या कालावधीत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये फारसा कालावधी नसला, तरी कार्यभार व्यवस्थापनाबाबत ‘बीसीसीआय’कडून ‘आयपीएल’ फ्रेंचायझींना कोणत्याही सूचना केल्या जाणार नसल्याचे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हार्दिकला वेगळा न्याय?

‘आयपीएल’ सहभागासाठी रणजी करंडकात खेळणे अनिवार्य करण्याचा विचार असला, तरी यातून काही खेळाडूंना सूट मिळू शकेल. यात अष्टपैलू हार्दिक पंड्याचे नाव आघाडीवर आहे. ‘‘प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणे हार्दिकला शारिरीकदृष्ट्याच शक्य होऊ शकणार नाही. तो ‘आयसीसी’च्या स्पर्धांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असावा असे भारतीय संघाला वाटते. त्यामुळे त्याला हा नियम लागू होणार नाही. काही युवकांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता आपण तंदुरुस्तीवर काम करत असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. हे कुठे तरी थांबायला हवे,’’ असे ‘बीसीसीआय’चा अधिकारी म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button