घटस्थापना मुहूर्त व माहिती
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी पंडित डॉ. उमेश सुतार
दि ३/१०/२०२४ गुरुवार या दिवशी शाकंभरी नवरात्र उत्सवाचा आरंभ होत आहे
महिषासुर नावाच्या असुराशी आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.
`उपांग ललिता’ ही जगत जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात देवीची उपासना व पूजन होते.
नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ” हा नामजप जास्तीतजास्त करावा.
घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेली शक्ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्ती) मिळते.
*घटस्थापणा मुहूर्त*
दि. ३ ऑक्टोम्बर गुरुवार या रोजी प्रतिपदा संपूर्ण दिवसभर आहे
शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून २७ मी. ते सकाळी ७ वाजून ५६ मी. पर्यंत आहे
लाभ अमृत मुहूर्त दुपारी १२
वाजून २३ मी पासून दुपारी १ वाजून ५३ मी. पर्यंत आहे
या काळात अथवा दुपारी १वाजून ५३ मी. ते दुपारी ३ वाजून २२ मी हा राहू काळ सोडून आपल्या घरा मध्ये शक्य तो सकाळी देवाची घटस्थापना करावी
(राहू काळ संध्याकाळी ४.४३मी ते ६.११मी पर्यंत आहे )
अखंड दीपप्रज्वलन करावा
दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.
नऊही दिवस देवीला यथाशक्ती विविध प्रकारांचा नैवेद्य दाखवावा
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ ,हळद,कुंकू,सौभाग्य अलंकार,वेणी,गजरा,पाच फळे (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
साडी, खण ,नारळ सर्व वस्तू या देवीच्या चरणांवर अर्पण कराव्यात त्यानंतर पाच वेळा तांदळाने (त्यात अखंड तांदूळ असावा सोबत खोबरे, हळकुंड, खारीक असावेत)तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ ,फळे यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करावेत.
कुमारिका-पूजन कसे करावे ?
दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात. मात्र, दहा वर्षांवरील कुमारिकांचा समावेश कन्या पूजनात करू नये.
`नवरात्रामधील शक्यतो पाचव्या (पंचमी) सातव्या (सप्तमी),आठव्या (अष्टमी), अथवा नवव्या(नवमी) माळेला अथवा कोणत्याही एका दिवशी शक्य असल्यास नऊ (अथवा विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे) कुमारिकांना बोलावून त्यांचे पूजन करावे
कुमारिकांचे स्वागत करून त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे त्यांचे पाय ताम्हणामध्ये ठेऊन पाण्याने पंचामृताणे पूजा करावी पुन्हा पाय पाण्याने धुवावे हळद, कुंकू,फुल अर्पण करावे नमस्कार करावा त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.
देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)अथवा तसेच त्यांना आवडणारे पदार्थ त्यांना खाऊ घालावेत
कुमारिकांना नवे वस्त्र ,रुमाल असे अथवा खेळणी देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.
घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य
नवरात्रोत्सवात शेतातील काळी माती, एक पत्रावळी, सात प्रकारचे सप्तधान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, नारळ, विड्याची पाने, सुपारी, नाणी, कलशाला बांधण्यासाठी सप्तरंगी धागा, धूप-दीप, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य आवश्यक
घटस्थापना
गुरुवारी प्रतिपदा संपूर्ण दिवस आहे शुभ मुहूर्त या काळात घटस्थापना करावी शक्यतो घरातील घटस्थापना सकाळ पासून दुपारी १२ वाजे पर्यंतच करावी.
सर्व देवांची पंचामृताने पूजा करावी सर्व देव नंतर देव्हाऱ्यात पानाच्या विड्यावर मांडावेत देव्हाऱ्यासमोर पत्रावळी ठेवावी त्यावरती काळी माती घ्यावी घटाला (कुंभाला अथवा कलशाला) धागा ५ फेरे बांधावा पत्रावळीच्या मध्यभागी देवीचा घट ठेवावा मातीमध्ये सप्तधाण्य टाकावे मध्यभागी घट आणि बाजूने काळी माती त्यात धान्ये पेरावे घटा मध्ये पाणी एक सुपारी एक नाणे हळद कुंकू अक्षदा टाकावे ५ विड्याची पाने घटावर लावावीत नारळ घटावर ठेवावा घट हा देवाच्या समोर मांडावा पहिली माळ घटा मधुन पानाच्या विड्याची देवांवर सोडावी अखंड नंदादीप चालू ठेवावा रोज थोडे पाणी घटावर शिंपडावे तसेच रोज वेगवेगळ्या फुलांची माळ घालावी आपल्या देवांना रोज नानाविविध फुले अर्पण करावी अखंड दीप प्रजवलीत ठेवावा कुटुंबातील प्रथेनुसार सुवासिनी कुमारिका यांना भोजन वस्त्रे द्यावीत घटाला फुलोरा लावावा(पाचव्या अथवा सातव्या माळेला)
देवीची नवरात्रातील नऊ रूपे
नऊ दिवस देवीची विविध रूपात पूजा केली जाते
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१)शैलपुत्री
२) ब्रह्मचारिणी
३)चन्द्रघंटा
४)कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५)स्कंदमाता
६)कात्यायनी
७)कालरात्री
८)महागौरी
९)सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
या वर्षीचे नवरात्रातील नऊ रंग
१) पिवळा
२) हिरवा
३) राखाडी
४) नारंगी
५) पांढरा
६) लाल
७) निळा
८) गुलाबी
९) जांभळा