क्रीडा

यशस्वी जैस्वालने किल्ला लढवला, इंग्लंडला पुरून उरला! तरीही भारताचे ६ फलंदाज माघारी

।।यशस्वी भव:।। महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने युवा खेळाडूच्या शतकानंतर केलेलं ट्विट… इरफान पठाण यानेही यशस्वी जैस्वालचे कौतुक करताना म्हटले की, ”जो मुलगा एकेकाळी मैदानावर झोपायचा, तो आज भल्याभल्या खेळाडूंना मैदानावर पळवतोय..” भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हा युवा सलामीवीराने गाजवला, हे सांगण्यासाठी या दोन प्रतिक्रिया पुरेशा आहेत…

विशाखापट्टणम येथील कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वीने १७९ धावांची नाबाद खेळी करून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) यांना अनुक्रमे शोएब बशीर व जेम्स अँडरसन यांनी माघारी पाठवून भारताला धक्के दिले. पण, यशस्वी जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. यशस्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मध्ये ५०० धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला, तर दोन शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. भारताने पहिल्या सत्रात ३३ षटकांत १०३ धावांत २ विकेट्स गमावल्या, तर दुसऱ्या सत्रात ३१ षटकांत १२२ धावा चोपल्या. इंग्लंडला या सत्रात एकच विकेट घेता आली.

यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली. यशस्वी शड्डू ठोकून उभाच राहिला आणि त्याने चौकाराने दीडशे धावा पूर्ण केल्या. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून दिवसअखेर भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. यशस्वी २५७ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार व ५ षटकारांसह १७९ धावांवर नाबाद राहिला आणि ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. केएस भरत १७ धावांवर बाद झाला आणि भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३३६ धावा केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button