काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचा पहिल्या पसंतीचा उमेदवार असूनही आणि मतांच्या गणितात विजयाची खात्री असतानाही चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या सामाजिक न्यायाच्या चेहऱ्यावर जात वर्चस्वाचा ओढलेला तो ओरखडा होता. काँग्रेस पक्षाने आता हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेली चूक दुरुस्त करण्याचा, हंडोरे यांना राजकीय न्याय देण्याचा आणि आपल्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसून टाकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील एक धडाडीचे कार्यकर्ते, त्यानंतर काँग्रेसचे आमदार, मंत्री राहिलेले चंद्रकांत हंडोर व भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. परंतु मतदानाच्या वेळी चक्रे फिरली आणि हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला. भाई जगताप मात्र आश्चर्यकारकरित्या विजयी झाले. हंडोरे यांना उमेदवारी देऊन दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, असा प्रयत्न त्या पक्षाचा कायमच राहिला आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा पक्ष असा पक्षाचा चेहराही लोकांसमोर त्यांना आणायचा होता. परंतु हंडोरे यांच्या पराभवाने काँग्रेसच्या सामाजिक न्यायाच्या चेहऱ्यावरच पक्षांतर्गत जातवर्चस्वाचा ओरखडा ओढला गेला.