महाराष्ट्रशेत-शिवार
खड्डा पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत कसं बनवायचं
सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतां ऐवजी सेंद्रिय पदार्थाचा वापर एवढाच मर्यादित अर्थ नसून व्यापक दृष्टीने विचार केला तर या पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर, जनावरांचे मल-मूत्र, पिकांची फेरपालट, आंतरपिक पद्धतीचा वापर, हिरवळीचे खत, शेतातील काडीकचऱ्याचे कंपोस्ट खत, गांडूळ खत, उपयुक्त जीवाणू संवर्धनाचा वापर करणे.
सेंद्रिय व नैसर्गिक घटकांचा पीक संरक्षणासाठी वापर, रोग व कीड प्रतिबंधक प्रजातींचा आणि बियाणांचा वापर वगैरे प्रमुख बाबींचा जमिनीत सुपीकता आणि उत्पादकता कायम राखण्यासाठी अथवा वाढविण्यासाठी अंतर्भाव करण्यात येतो आणि पर्यायाने हेच सेंद्रिय शेतीचे प्रमुख घटक आहेत.
कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत
- शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, तण, गावातील घरातील केर, चुलीतील राख, जनावरांचे शेण, न खाल्लेला मलमूत्र मिश्रीत चारा व गोठ्यातील माती, पिकांचे धसकटे, गव्हाचे काड इत्यादी पासून कंपोस्ट खत तयार करता येते.
- कचऱ्यातून दगड, विटा, काचेचे/लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी न कुजणाऱ्या वस्तू वेगळ्या कराव्यात.
- शेतातील जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थांचे थरावर थर रचून खड्डा भरावा.
- सर्वसाधारणपणे कंपोस्ट खड्डा २ मी. रुंद व १ मी. खोल असावा. लांबी आवश्यकतेनुसार ५ ते १० मीटर पर्यंत ठेवावी. दोन खड्ड्यांमध्ये २ ते ३ मीटर अंतर असावे. खड्ड्याचा तळ व बाजू थोड्या ठोकून टणक कराव्यात.
- सेंद्रिय पदार्थांचा पहिला थर ३० से.मी. जाडीचा करून चांगला दाबावा. त्यावर शेण, मलमूत्र यांचे पाण्यात कालवलेले मिश्रण टाकावे. तसेच युरिया व सुपर फॉस्फेटचे द्रावण आणि पाणी टाकावे.
- अंदाजे ६० टक्के ओलावा राहील अशा प्रकारे कचरा ओलसर करावा.
- जुने शेणखत उपलब्ध असल्यास तेही (१ घमेले) द्रावणात मिसळावे.
- स्फुरदाच्या वापरामुळे खताची प्रत सुधारते तर नत्राच्या वापराने कचऱ्यातील (सेंद्रिय पदार्थातील) कर्ब नत्र यांचे प्रमाण योग्य राहून जीवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे खत लवकर तयार होऊन खतातील नत्राचे प्रमाण वाढते.
- अशारीतीने थरांवर थर रचून खड्डा जमिनीच्या वर ३० ते ६० से.मी. इतका भरावा. संपूर्ण खड्डा कोरड्या मातीने अथवा शेणामातीने जाड थर देऊन झाकावा. म्हणजे आतील ओलावा कायम राहील.
- एक ते दीड महिन्यानंतर कचऱ्याची पातळी खाली जाते. नंतर परत खड्ड्यात काही कचरा भरून पुन्हा खड्डा बंद करावा.
- अशारीतीने खड्डा भरल्यास १६ ते २० आठवड्यात चांगले कंपोस्ट तयार होते.
तयार कंपोस्ट खताची ओळख
- खड्ड्यातील खताचे आकारमान कमी होऊन ३० ते ६० टक्यांपर्यंत येते.
- उत्तम कुजलेले खत मऊ होते व सहज कुस्करले जाते.
- खताचा रंग तपकिरी किंवा गर्द काळा होतो.
- खताच्या खड्ड्यात हात घालून पाहिल्यास आतील उष्णतामान कमी झालेले दिसते.
- चांगल्या कुजलेल्या खतास दुर्गंधी येत नाही.