मतदान केंद्र येती घरा…कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरूवात
मतदान केंद्र येती घरा…
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरूवात
प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच होय. मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे मतदान पथक रवाना होते, अगदी त्याच प्रमाणे जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील गृह मतदानाच्या प्रक्रियेस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार आज सकाळी सुरुवात झाली.
मा. भारत निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसारच 85 वर्षांवरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग (40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व) अशा मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून दि.16 नोव्हेंबर पर्यंत मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या 4 हजार 601 गृहमतदान होणार आहे.
गृह मतदान प्रक्रिया म्हणजे एकप्रकारचे मतदान केंद्रच होय. या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी 1, 2, 3, एक शिपाई आणि बंदोबस्ताला पोलिस असे पथक असते. हे पथक मतदाराच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत याची माहिती देतात. त्यानंतर मतदान केंद्रावर होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते. मतदान केंद्राप्रमाणेच येथेही मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे. त्यामुळे मतदानाची गुप्तता कायम राहते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटात बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते. त्यामुळे गृह मतदानाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच असते.