खंडित विजेबाबत करवीर शिवसेनेचे गांधीनगरात ढोल बजाओ आंदोलन
गांधीनगर वीज कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करताना करवीर तालुका शिवसैनिक.
वीज कार्यालयासमोर निदर्शने : अधिकाऱ्यांचा निषेध : अन्यथा टाळे ठोकू
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध गांधीनगर बाजारपेठेतील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने येथील वीज कार्यालयासमोर बुधवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी ढोल वाजवत अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला व तीव्र निदर्शने करत निषेध नोंदविला. दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर वीज खंडित केल्यास वीज कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले. गांधीनगर बाजारपेठेतील बारा तास वीज खंडित करून सोमवारी वीज वितरण कंपनीने ‘विक्रम’ नोंदवला. या ‘विक्रमा’चा नाहक त्रास ग्राहक, व्यापारी वर्ग व खरेदीसाठी आई-वडिलांबरोबर आलेल्या लहान बाल-बालिकाना झाला. ग्रामस्थांसह सर्वजण हैराण झाले. वीज खंडित होण्याची पूर्वकल्पनांना न दिल्याने इन्वर्टरही रिचार्ज नसल्याने ते काही काळच चालले. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा सर्वांनाच त्रास झाला. याचा जाब विचारण्यासाठी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी ढोल वाजवत वीज कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक अभियंता विजय कोठावळे यांना तालुकाप्रमुख राजू यादव, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, दिलीप सावंत, दिपक पोपटाणी, दिपक अंकल, दिपक धिंग, शरद माळी, बाळासाहेब नलवडे यांनी जाब विचारला. किशोर कामरा, सुनिल पारपाणी, वसंत पोवार, आबा जाधव, नमेश चव्हाण, मोहन राजपूत, श्रीकांत सावंत, बाबुराव पाटील, धर्मेंद्र मेघवानी यांनी सध्या दसरा दिवाळी सणाचा बाजारपेठेत हंगाम सुरू असताना तरी वीज खंडित करू नका, अशी आग्रही मागणी केली. या आंदोलनात दिलीप कुकरेजा, रमेश वाच्छानी, सुरेश रंगलानी, संतोष निरंकारी, सोनू जयसिंगानी आदी व्यापारी प्रतिनिधीही सहभागी झाले.
अन्यथा वीज कार्यालयास टाळे ठोकू : राजू यादव
मागील अधिकाऱ्यांनी योग्य दक्षता न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा निर्वाळा सहायक अभियंता विजय कोठावळे देत होते. त्यांना थांबवत राजू यादव म्हणाले की मागील अधिकारी असेच सांगून गेले. तुम्हीसुद्धा काही केले नाही, असा खुलासा तुमच्या नंतर येणारा अधिकारी करेल. असे किती वर्षे ग्राहकांनी सहन करायचे? किमान सणाच्या तोंडावर तरी वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा कार्यालयास शिवसैनिक टाळे ठोकतील.