चावराई माध्यमिक विद्यालयात ‘हादगा’ पारंपारीक गीते सादर
चावरे : येथील चावराई माध्यमिक विद्यालयात ‘हादगा’ पारंपारीक गीते सादर .
”शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरण किल्ला …… ”
“एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू…. “
ही ग्रामीण भागातील लोकगितांची परंपरा अलिकडच्या काही वर्षात बंद होताना दिसत आहे चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थींनींना प्रोत्साहित करुन हादगा ही परंपरा टिकविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या शाळेत सायंकाळी हादगा गीते कानी पडताना दिसत आहेत.
कोकणात हादगा या सणाला ‘भोंडला’ म्हणतात. आज हा सण मोबईलमध्ये हरवूनच गेला आहे. पावसाळा संपत आलेला असतो,आणि पिके भरून आलेली असतात या काळात सुरू हस्त नक्षत्रात प्रवेश करतो आणि पावसाचा परतीचा काळ सुरू होतो रिकामे ढग मोठ्याने आवाज करत पाऊसाला सुरुवात करतो म्हणून त्यास हत्तीचा पाऊस म्हणतात याच काळात १६ दिवस हादगा खेळला जातो. ही सांकेतिक पूजा असून ती हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली असते. मुली एकत्र येवून गाणी म्हणत खेळ खेळतात. हादग्याच्या गाण्यातून राजांविषयीची माहिती,पावसाची आतुरता आणि आनंद,लोकगीते याविषयीची मुलींची भावना व्यक्त होत असते.या काळात मुली आळीपाळीने प्रत्येकीच्या घरी जाऊन गाणी म्हणून नेवेद्य अर्पण करतात त्यालाच खिरापत असे म्हणतात. लक्ष्मी वा गौरी ही धरणीची प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कुस उजवत नाही. मेघाला हत्ती समजून केलेली ही पूजा असते. अशी ही परंपरा लोप पावत चालली आहे. मात्र चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयाने गेली अनेक वर्षे हादगा ही परंपरा जोपासल्याने या शाळेतील मुलींना हादगा गीते पाठ असल्याचे पहायला मिळाले.