लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीतून काँग्रेसकडे वळलेले ए. वाय. पाटील यांच्यामुळे राधानगरी मतदार संघात राष्ट्रवादीची बनली डोकेदुखी
लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीतून काँग्रेसकडे वळलेले ए. वाय. पाटील यांच्यामुळे राधानगरी मतदार संघात राष्ट्रवादीची बनली डोकेदुखी
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,लोकसभा निवडणुकीत राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना दोन नंबरचे मताधिक्य मिळाले. 25 वर्षानंतर कोल्हापूर लोकसभेवर विजय मिळाल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मात्र, लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीतून काँग्रेसकडे वळलेले ए. वाय. पाटील यांच्यामुळे राधानगरी काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद वाढली आहे. भोगावती येथे झालेल्या मेळाव्यानंतर हे खदखद बाहेर आल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात ए. वाय. पाटील यांच्यावर निशाणा साधला नसला तरी काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोख त्यांच्यावरच असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत उपरा उमेदवार दिला तर प्रामाणिक कार्यकर्ता स्वीकारणार नाही. पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी राधानगरी तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत रविवारी भोगावती येथे करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णराव किरुळकर होते.
किरूळकर म्हणाले, “तालुक्यातील काँग्रेस पक्ष दुसऱ्यांच्या वळचणीला बांधल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. जिल्हा पातळीवरील नेत्यांनी तालुक्यातील सर्वांना विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये.”एकी नसल्यामुळे सातत्याने अन्याय झाला. आता काँग्रेस कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये . लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये किमान तीस हजार काँग्रेसचे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणाच्याही दावणीला बांधू नये,” असे गोकुळचे संचालक आर. के . मोरे यांनी स्पष्ट केले.