ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

निवडणूक रोखे मोठा घोटाळा, राहुल गांधींच्या विधानावर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब: काँग्रेस

 

Congress Nana Patole News: इलेक्ट्रोरल बॉन्ड स्कीमससंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. निवडणूक रोखे ही योजना अवैध असल्याचे सांगत ती स्थगित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इलेक्ट्रोरल बॉण्ड हा माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. मतदारांना पक्षाच्या फंडींगबाबत माहिती घेण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या भ्रष्ट धोरणांचा आणखी एक पुरावा तुमच्या समोर आहे. लाच आणि कमिशनसाठी भाजपने इलेक्टोरल बाँडला माध्यम बनवले होते. आज यावर शिक्कामोर्तब झाला, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना, इलेक्ट्रोरल बाँड मोठा घोटाळा असल्याच्या राहुल गांधींच्या विधानावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले आहे.

भाजपाने आता २०१९ पासून या योजनेखाली घेतलेले पैसे परत करावेत

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक रोखे योजना असंविधानिक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक रोखे (ईलेक्ट्रोरल बाँड) हा मोठा घोटाळा असल्याचे त्याचवेळी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. भाजपाने आता २०१९ पासून या योजनेखाली घेतलेले पैसे परत करावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारने जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिले त्याची पूर्तता झाली पाहिजे परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. माझी जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आधी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button