आरोग्य व शिक्षण

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस होणार बंद, शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नवी दिल्ली : देशभरात १६ वर्षांखालील मुलांचे कोचिंग (शिकवणी वर्ग) बंद होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत कोचिंग संस्थांना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर त्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (वृत्तसंस्था)

समुपदेशन आवश्यक
कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक ताणतणावापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. संस्थांकडे एक वेबसाइट असावी. त्यात शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम, तो पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृह सुविधा आणि शुल्क यांचा तपशील असेल.
दंड किंवा मान्यता रद्द
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्दची सूचना केंद्राने केली.

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे..

कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही. 
कोचिंग संस्था चांगले गुण वा रँकची आश्वासने देऊ शकत नाहीत.
१६ वर्षांखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही. 
कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी.
गुणवत्ता, सुविधा किंवा निकालांबद्दल कोणताही दावा करणारी जाहिरात स्वत: प्रकाशित करू शकत नाहीत किंवा अशा प्रकाशनात भाग घेऊ शकत नाहीत.
कोचिंग संस्थांना नैतिक अध:पतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या व्यक्तींना शिक्षक 
किंवा अन्य पदांवर नियुक्ती करता येणार नाही.
विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे, शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात. 
विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button