ताज्या बातम्या

अलिशान गाडीची धडक अनं पलायन

पराकोटीची असंवेदनशीलता

 

रघुनाथ थोरात

 

कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील अपघाती प्रसंग.दुपारचे ठीक ०२.५० वाजले होते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ तशी विरळच होती. रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांतून कशी-बशी वाट काढत चरेगावहून उंब्रजच्या दिशेला आपली तीन चाकी मालवाहतूक रिक्षा चालवताना ड्रायव्हरला मोठी कसरत करावी लागत होती. अशातच अचानकपणे पाठीमागून आलेल्या आलिशान पांढऱ्या गाडीने जोराची धडक दिल्याने मालवाहतूक रिक्षा अक्षरशः चेंडूप्रमाणे उडत रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. धडक दिल्यानंतर सदर आलिशान गाडीत बसलेल्या लक्ष्मीपुत्राच्या बेट्याने गाडी रस्त्याकडेला घेत आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतला अनं आसपास कोणीच नसल्याचा फायदा घेत काहीच घडले नाही अशा अविर्भावात आपल्या आलिशान गाडीसह घटनास्थळावरून धूम ठोकली. रिक्षाच्या पाठीमागील हौद्यामध्ये चार-पाच शाळकरी मुली बसल्या होत्या. त्या भेदरलेल्या अवस्थेतच रिक्षातून खाली उतरल्या. त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून सुदैवानं त्या सुरक्षित होत्या. प्रसंगावधान राखून नागरिकांनी उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे यांना संपर्क साधून याबाबतची माहिती कळवल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहतूक कर्मचाऱ्यांना उंब्रज येथील पाटण तिकाटण्यात नाकाबंदी करण्यास सांगितले.परंतु,सव्वाशेर ठरलेला हा लक्ष्मी पुत्राचा बेटा उंब्रज परिसरातून बाहेर पडण्यास यशस्वी झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा जवळपास पन्नास फूट रस्त्याच्या कडेला झाडावर फेकली गेली. विचार करा, रिक्षातील हौद्यामध्ये बसलेल्या चिमूरड्या मुली बाहेर फेकल्या जाऊन त्या आलिशान कारच्या चाकाखाली आल्या असत्या तर किती मोठा अनर्थ घडला असता? परंतु, त्यांचे दैव बलवत्तर आणि ईश्वर कृपेने त्या सुरक्षित होत्या. परंतु, येथे एक प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे त्या लक्ष्मी पुत्राच्या बेट्याने दाखवलेल्या पराकोटीच्या असंवेदनशीलतेचा..कोठून आली एवढी असंवेदनशीलता? धडक बसल्यानंतर गाडीतून उतरून त्या कोवळ्या मुलींची झालेली अवस्था पहावी अन त्यांना मानसिक धीर द्यावा असे त्यास का वाटले नाही? पैशाच्या जोरावर,संपत्तीच्या मदमस्त धुंदीत आपण समाजात कसाही वागू शकतो,उन्मत्तपणे स्वैराचार करू शकतो हा अहंकार त्याच्या नसानसात ठासून भरलेला दिसत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला वेळीच आवर,पायबंद घालून ताळ्यावर आणणे आवश्यक आहे.नाहीतर पुण्यात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊन कैक निष्पापांचे किड्यामुंगीसारखे जीव जातील,हे मात्र नक्की…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button