ताज्या बातम्या

कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेसफाईची कामे गतीने करा -राजेश क्षीरसागर

कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेसफाईची कामे गतीने करा -राजेश क्षीरसागर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर, नियोजन विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी देण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतला. यावेळी त्यांनी शहरातील रस्ते, वाहतूक, नालेसफाई, प्रॉपर्टी कार्ड वितरण आदी कामांबाबत गतीने कामे करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक कामाचे कालावधीनिहाय नियोजन करुन उर्वरीत कामे वेळेत मार्गी लावण्याचे निर्देश दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि महानगरपालिका विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेसाठी वितरीत केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना राबवा. बावडा रींग रोडचे काम तातडीने पूर्ण करा. जास्त पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरते त्या अनुषंगाने नालेसफाई योग्यरीत्या करा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. याबरोबर शहरातील 64 झोपडपट्टयांबाबत प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा आढावा घेण्यात आला. यातील 21 झोपडपट्टया शासकीय जागेवर, 28 महानगरपालिकेच्या जागेवर तर उर्वरीत 15 या खासगी जागेवर आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत प्रत्येक झोपडपट्टीची वर्गवारी करुन त्या त्या भागातील सर्वे, लेआऊट आणि इतर अनुषंगिक कामांचे नियोजन करुन 45 दिवसांचा प्लान तयार करण्याच्या सूचना दिल्या.

 

या बैठकीत राजाराम बंधारा येथील नवीन पूलाच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. भूसंपादनबाबत नव्याने मोजणी करण्याची प्रक्रिया या आठवड्यात मार्गी लावून त्यानंतर किमान साडे तीन महिने अवधी लागेल. त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरु करता येईल, असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले. बांधकाम, उपविभागीय कार्यालय व मोजणी कार्यालयाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन मार्च 2025 अखेर सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हा क्रीडा विभागाकडील फुटबॉल अकादमी प्रक्रियाबाबतही आढावा झाला. कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी कोल्हापूरात अशी अकादमी गरजेची असून त्यामुळे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, असे मत व्यक्त केले. या अकादमीसाठी शेंडा पार्क येथे १० हेक्टर जागा लागणार आहे. त्याच जागेत क्रीडा विभागाचे कार्यालयही प्रस्तावित आहे. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे स्वागत केले तर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button