मतमोजणी दिवशी कलम 144 अन्वये मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश जारी
बहुउद्देशिय हॉल व शासकीय गोदाम येथे मतमोजणी दिवशी
कलम 144 अन्वये मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश जारी
मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये अशी असणार नियमावली
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,जिल्हयातील ४७- कोल्हापूर व ४८-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक ४ जून २०२४ रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणा-या उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.४७- कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी बहुउद्देशिय हॉल, शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कोल्हापूर येथे व ४८-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर येथे मंगळवार दिनांक ४ जून २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये बहुउददेशिय हॉल, शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कोल्हापूर व शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर परिसरात दिनांक ४ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
खालील कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे-
४७-कोल्हापूर लोकसभा मतदार संघाकरीता होणाऱ्या मतमोजणीसाठी बहुउद्देशिय हॉल, शासकीय धान्य गोडावून समोर, रमणमळा या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रमणमळा पोस्ट ऑफिस चौक, पितळी गणपती चौक, पोवार मळा, भगवा चौक या ठिकाणापासून पुढे जाण्यासाठी (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी वगळून) मज्जाव करण्यात येत आहे. पितळी गणपती चौक येथे शिवसेना व इतर संलग्न पक्ष व महायुतीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी/कार्यकत्यांना येथे थांबण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. मेरीवेदर ग्राऊंड कोल्हापूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येथे थांबतील या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे.
४८- हातकणंगले लोकसभा मतदार संघाकरीता होणाऱ्या मतमोजणीसाठी, शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर या नियोजित ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीकरीता पाटील मळा सरनोबतवाडी, विद्यापीठ टोल नाका कृषी विद्यापीठ परीसर या ठिकाणापासून मतमोजणी ठिकाणी जाण्यासाठी (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी वगळून) मज्जाव करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ गेट नं.१ समोर नॅनो सायन्स येथे शिवसेना व इतर संलग्न पक्ष व महायुतीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी/कार्यकत्यांनी येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे. युको बँक KSBP चौक येथे शिवसेना ठाकरे गट व इतर संलग्न पक्ष या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे. तसेच रेणुका मंदीर, सरनोबतवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संलग्न पक्ष तसेच अपक्ष पक्षांचे कार्यकर्ते थांबतील त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना येथे थांबण्याकरीता मज्जाव करण्यात येत आहे.
मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी/पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरीक्त कोणाही व्यक्तिला प्रवेश करण्यासाठी मनाई.
मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करण्यासाठी मनाई.
आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे, चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे.
मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविण्यासाठी. (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून.)
मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून.)
मतमोजणी ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे.
मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने (शस्त्र अधिनियम १९५९ व नियम २०१६ मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. चा वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून.) यासाठी मनाई करण्यात येत आहे.
या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, हा आदेश क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे.