ताज्या बातम्या

पंढरपुरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस

पंढरपुरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस

सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी उमेश सुतार

पंढरपूर: आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. या धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये भाविकांनी पालिकेच्या सूचना पाहूनच निवास करावा असं असे आवाहन प्रशासन अधिकारी सुनील वाळूजकर यांनी केले आहे. यंदाची आषाढी एकादशी 17 जुलै रोजी असून त्याचे प्रशासनाकडून नियोजन जवळपास पूर्ण झालं आहे.

 

आषाढीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता निवासाची शहरात अतिशय तोकडी व्यवस्था असते. अशावेळी हे भाविक मंदिर परिसरातील शेकडो जुनी घरे, वाडे, मठ, धर्मशाळा यामध्ये यात्रा कालावधीमध्ये निवास करत असतात. मात्र शहरातील हे जुने वाडे, धर्मशाळा वगैरे इमारती जीर्ण झाल्याने यातून अपघाताचा धोका संभवू शकतो.

 

धोकादायक इमारतींच्या दर्शनी भागावर नोंद

यासाठी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूर शहरातील सर्व जुन्या इमारतींची पाहणी पूर्ण केली आहे. यात तब्बल 113 इमारती धोकादायक आढळून आल्याने पालिकेने अशा मालकांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशभरातून येणाऱ्या भाविकांना याची माहिती व्हावी म्हणून अशा इमारतींवर धोकादायक इमारत अशी नोंद दर्शनी भागात करण्यात आली आहे.

 

धोकादायक झालेल्या इमारतींपैकी काही इमारतींची दुरुस्ती घर मालकाकडून सुरु करण्यात येत असून यावर देखील पालिका प्रशासन लक्ष ठेऊन आहे. अति धोकादायक असणाऱ्या इमारती नागरपालिकेकडून पाडण्यात येणार आहेत. ज्या इमारतींची न्यायालयीन प्रक्रिया चालू नसेल अशा इमारती मालकांनी उतरवून घेण्याची नोटिस प्रशासनाने दिली आहे.

 

भाविकांनो, काळजी घ्या

घर मालकाने अशा इमारती न पडल्यास प्रशासन या इमारती पडण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सुनील वाळूजकर यांनी सांगितले. अशा धोकादायक इमारतीमध्ये भाविकांनी निवास करू नये असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे पंढरपूरला येत असताना भाविकांनी आपण कोणत्या इमारतीमध्ये राहतो, ती सुरक्षित आहे का याची खात्री करा आणि मगच निवास करावा असे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button