“पक्ष कमजोर झाला की शरद पवार काँग्रेसमध्ये जातात आणि…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत, म्हणाले…
४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलिन होण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात सामील व्हा, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना उद्देशून केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिल्याची चर्चा झाली. परंतु, ही ऑफर नसून हा सल्ला आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही. हा सल्ला आहे. मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर पवारांच्या लक्षात आलं की बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीय. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की ४ जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पवारांना समजतोय. त्यापुढे नरेंद्र मोदी असं म्हणाले की काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात यावं, तर तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफ होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी केलं.